पुणे - राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला चढताना एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली आहे. ही घटना गुरुवारी (15 जानेवारी) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. विकास बिरुदेव गावडे (वय 45), असे मृत पर्यटकाचे नाव आहे. बालेकिल्ल्याच्या दरवाज्यातच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजगड किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट ही अतिशय खडतर आहे. विकास गावडे यांच्यासह आणखी काही जण राजगडावर पर्यटनासाठी आले होते. या सर्वांनी राजगड किल्ल्याचा पहिला टप्पा पूर्णही केला. नंतर ते बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी निघाले. बालेकिल्ल्यावरील दगडी पाऊल वाटेने चढाई केल्यानंतर विकास गावडे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते दरवाजाच्या चौथऱ्यावरच कोसळले. तिथेच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मुत्यू झाल्याची माहिती वेल्हा येथील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.