पुणे - किरकोळ आणि घाऊक या दोन्ही बाजारात टोमॅटो चांगलेच महाग झाले आहेत. परराज्यातून आणि महाराष्ट्रातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव चांगलेच वाढले आहेत. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील मार्केटमध्ये एका कॅरेटला 700 ते 1300 रुपये दर मिळत आहे.
टोमॅटोचे भाव का वाढले -साधारणतः एका कॅरेटमध्ये 20 किलो टोमॅटो असतात आणि आता याच टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील शेतकरी टोमॅटो घेऊन बाजारात येत असतात. आता राज्यातील तसेच विविध राज्यातून टोमॅटोचे होत असलेले उत्पादन बंद झाल्याने आणि यंदा शेतकऱ्यांकडून टोमॅटोचे उत्पादन कमी काढल्याने हे दर वाढले असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे.
टोमॅटोचे भाव गगनाला -सध्या नारायणगाव येथील मार्केटमध्ये 30 हजार कॅरेटची आवक होत आहे. याआधी 50 हजार कॅरेटची आवक होत होती. आता शेतकऱ्यांकडून टोमॅटोचे पीक यंदा कमी काढल्याने त्याचे दर वाढले असल्याचे सांगितले जात आहे. तर बिपरजॉय वादळामुळे झालेल्या पावसाचा महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातसारख्या राज्यांतील टोमॅटो पिकावर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे बिहार आणि पश्चिम बंगालमधील कडाक्याच्या उष्णतेमुळे टोमॅटोच्या पिकांवरही परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. परिणामी, देशातील अनेक राज्यांतील मंडईंमध्ये टोमॅटोची आवक घटली. त्यामुळे दर गगनाला भिडले असल्याचे देखील सांगितले जात आहे.