पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरूवात झाली आहे. सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. सकाळपासूनच नागरिक आपला हक्क बजावण्यासाठी येत आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक बूथवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक सकाळच्या वेळेतच मतदान करत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
लोकशाही मजबूत होण्यासाठी मतदान : मी आज सकाळीच लंडनहून पुण्यात आले आहे. घरी थोड वेळ थांबून मी थेट आत्ता मतदानाला आले आहे. लोकशाही मजबूत व्हावी, यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. यासाठी मी आज मतदानाला आले आहे. मी गेल्या चार वर्षांपासून लंडन येथे राहत आहे. जेव्हा मला इथे पुण्यात यायचे होते, तेव्हा कळाले की इथे पोट निवडणूक जाहीर झाली आहे. आज मी थेट मतदानाला आहे आहे, असे देखील यावेळी अमृता देवकर यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात : आज सकाळी 7 वाजल्यापासून कसबा पेठ विधानसभा मतदार संघात मतदानाला सुरवात झाली आहे. या मतदार संघामध्ये एकूण २ लाख ७५ हजार ६७९ मतदार आहेत. २७० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार २५० अधिकारी कर्मचारी नियुक्त आहेत. कसबा पोट निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरल्याचे दिसून आले होते.