पुणे - अल्पावधीतच टिकटॉक स्टार म्हणून नावारूपाला आलेल्या समीर गायकवाड (वय 22) या तरुणाने आत्महत्या केली. पुण्यातील राहत्या घरात पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. रविवारी सांयकाळी वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत ही घटना घडली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी समीरचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट -
रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास केसनंद रस्त्यावरील मिकासा इमारतीत टिकटॉक स्टार अभिनेता समिर गायकवाडने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत समीरला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. समीरने आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोशल मीडियावर समिरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे अनेक चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
यापूर्वी देखील देश-विदेशातील काही टिकटॉक स्टार्सनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जून २०२०मध्ये सिया कक्करने आत्महत्या केली होती. त्यानंतर अमेरिकन टिकटॉक स्टार डेझरिया क्विंट नोयाने देखील गेल्या आठवड्यात आत्महत्या केली.