पुणे - जिल्ह्याच्या शिक्रापूर येथील सर्पमित्रांनी पकडलेल्या विषारी नागाने एकोणीस अंडी घातले. मात्र त्या अंड्यातून कृत्रिम पद्धतीने तब्बल अठरा नागाच्या पिलांना जन्म देण्यात वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांना यश आले आहे. सर्व पिलांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे.
सर्पमित्रांच्या प्रयत्नातून नागाने दिला अठरा पिलांना जन्म बरणीत ठेवला विषारी नाग -
वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेतील शिरूर यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला एक मोठा कोब्रा जातीचा विषारी नाग पकडला. त्याला घरी आणून बरणीमध्ये ठेवला. नागाने चक्क बरणीमध्येच एकोणीस अंडी घातली असल्याचे सर्पमित्रांना दिसून आले होते. यावेळी त्यांनी तातडीने शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अंडी विशिष्ठ अशा मातीमध्ये कृत्रिम पद्धतीने उबविण्यास ठेवली. दरम्यान वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी वेळोवेळी सदर अंड्यांची पाहणी केली. त्यांनतर तब्बल सत्तर दिवसांनी त्या अंड्यांतून अठरा पिल्ले जन्मलेली असल्याचे सर्पमित्रांना दिसून आले. त्या सर्व पिलांना त्यांनी घनदाट जंगलात मोकळा श्वास घेण्यासाठी सोडण्यात आले.
शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव विनायक बडदे यांना माहिती देत शिरुर वनविभागाच्या वनरक्षक सोनल राठोड यांच्या उपस्थितीत सर्व नागाची पिल्ले निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी बोलताना आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आले असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.