आशादायक; पिंपरी-चिंचवडमधील पॉझिटिव्ह आलेल्या तिघांची टेस्ट आली निगेटिव्ह ! - डिस्चार्ज
कोरोना विषाणूने बाधित झालेल्या पिंपरी चिंचवडमधील तिघांना रुग्मालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात प्रथम तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात गेल्या 14 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्यानंतर कोरोना बाधित असलेल्या तिघांचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून आज पुन्हा पुण्यातील एनआयव्हीमध्ये घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले जातील. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
पुण्याच्या डिस्चार्ज झालेल्या दाम्पत्याबरोबर हे तिघे दुबईला गेले होते. त्यानंतर संबंधित दाम्पत्य हे करोना बाधित असल्याचे समोर आले. त्याचबरोबर 10 मार्चला संबंधित तिघांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या घशातील द्रव्यांचे नमुने पुण्यात एनआयव्हीला पाठविण्यात आले, त्यात ते करोना बाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आयसोलेशन विभागात तिघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, डॉक्टरांच्या 14 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालात तिघेही निगेटिव्ह आले आहेत. परंतु, त्यांची आणखी एक चाचणी होणार असून त्याचा अहवाल रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी येणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. त्यांचा अहवाल हा पुन्हा निगेटिव्ह आला, तर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.