पुणे- विभागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 563 झाली आहे. यातील 9 हजार 778 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 5 हजार 83 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विभागातील 702 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, 255 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.83 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.51 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागातील एकूण रुग्णांपैकी पुणे जिल्ह्यातील 12 हजार 147 रुग्ण आहेत. यातील 7 हजार 619 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, सध्या 4 हजार 27 रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यातील एकूण 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 255 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.72 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.12 टक्के इतके आहे. सोमवारी पुणे विभागातील रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 365 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 270, सातारा जिल्ह्यात 12 , सोलापूर जिल्ह्यात 63, सांगली जिल्ह्यात 20 तर कोल्हापूर जिल्ह्यात 0 अशी रुग्ण संख्या आहे.
सातारा जिल्हयात 738 कोरोनाबाधित रुग्ण असून 508 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 196 आहे. एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.