पुणे- वाघोली येथील भैरवनाथ मंदिराजवळ असणाऱ्या तळ्यात आई-मुलासह तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे वाघोली परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.
रोहिणी संजय पाटोळे (वय 40 वर्षे), स्वप्निल संजय पाटोळे (वय 12 वर्षे) आणि दत्तात्रय रघुनाथ जाधव (वय 42 वर्षे, रा. वाघोली गावठाण) असे मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी आणि त्यांचा मुलगा स्वप्निल हे कपडे धुण्यासाठी मंदिराजवळील तळ्यात गेले होते. त्यावेळी स्वप्निल पोहण्यासाठी तळ्यात उतरल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, स्वप्निल पाण्यात बुडत असल्याचे पाहून आई रोहिणी यांनी तळ्यात त्याला वाचविण्यासाठी उडी घेतली. मात्र, ते दोघेही बुडू लागले. यामुळे या दोघांना वाचवण्यासाठी जाधव यांनी तळ्यात उडी घेतली. मात्र, तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.