पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
रविवारी रात्री पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅक्टर आणि फॉर्च्यूनर गाडीचा अपघात झाला. या अपघातात फॉर्च्यूनर गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील मुलगी आणि ट्रॅक्टरचालक जखमी आहेत.
पुणे (बारामती) -ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि फॉर्च्यूनर गाडीची जोरदार धडक झाली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इंदापूर तालुक्यातील डाळज गावच्या हद्दीत पुणे -सोलापूर महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात घडला. ट्रॅक्टर चालक गोरख मल्हारी बिगबाग (वय ६०, रा. संग्रामनगर अकलूज ता. माळशिरस जि.सोलापूर) यांनी भिगवण पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. या अपघातात गीता अरूण माने (वय ३६), मुकुंद अरुण माने (वय २५), अरुण बाबुराव माने (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी रात्री इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर दोन गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावरून मौजे केत्तुर येथील ट्रॅक्टर ऊस वाहतूक करत होता. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात फॉर्च्यूनर गाडी ट्रक्टरला येऊन धडकली. ही धडक जोरदार असल्याने अपघातात फॉर्च्यूनरमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. साक्षी अरुण माने (वय १८), ट्रक्टर चालक महादेव रखमाजी नेटके (वय ५६), हे दोघे जखमी झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रुपनवर करत आहेत.