पुणे :राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर आज खात्यांचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्थ खात्याची जबाबदारी अजित पवारांकडे सोपवली आहे. गेल्या काही दिवसापासून शिंदे समर्थक, आमदारांचा अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास विरोध होता. आज अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते दिल्यानंतर शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अर्थ खात्याची जबाबदारी पवारांकडे : मुख्यमंत्र्यांनी खातेवाटपाचा निर्णय आज जाहीर केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी होती. मात्र, ते जबादारीपासून पळ काढत होते, असा आरोप देखील केसरकर यांनी केला आहे. त्यानंतर आम्हाला शिवसेनेत बंड करावे लागले. आता आमची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असले तरी, आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. प्रत्येकवेळी राजकीय परिस्थिती वेगळी असते. अजित पवार हेही चांगले नेते आहेत. या तिघांचे सरकार महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.
आमच्यात कोणी नाराज नाही :मुख्यमंत्री बहुतेक कामे करतात. दोन उपमुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले आहे, अजूनही चांगले काम करत आहेत. अब्दुल सत्तारांनी राष्ट्रवादीला कृषीमंत्री पद दिले पाहिजे असे सांगितले होते. त्यामुळे आमच्यात कोणी नाराज नाही, अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असले तरी, आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असे देखील केसरकर यांनी म्हटले आहे.