पुणे : 'पुणे तिथे काय उणे' असे नेहेमीच म्हटले जाते. याची प्रचिती ही आपल्याला अनेकदा विविध माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत आपण मोबाईल, दागिने व सोने - चांदीच्या चोरी तसेच घरफोडीच्या घटना पाहिल्या असतील, मात्र आता पुण्यातील खडकी परिसरातून चक्क 30 ते 40 हजार रुपयांच्या चपला चोरीला गेल्या आहेत. या चप्पल चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सागर दत्ता चांदणे, (वय 23 वर्षे), रा. महादेववाडी, खडकी, आकाश विक्रम कपुर, (वय 22 वर्षे), रा. खडकी, अरबाज जाफर शेख, वय 21 वर्षे, रा. खडकी यांना अटक केली असून हरेश श्रीचंद अहुजा, (वय 38 वर्षे), यांनी घटनेची फिर्याद दिली होती.
55 चपलांचे बूट चोरून नेले : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील खडकी भागातील एका दुकानातून तब्बल 55 चपला आणि बूटांचे जोड चोरट्यांनी चोरून नेले. या चपलांची किंमत जवळपास 30 ते 40 हजार रुपये एवढी होती. यामध्ये 40 मेन्स शूज तर 15 लेडीज चपला चोरट्यांनी चोरल्या होत्या. हरेश आहूजा यांचे पुण्यातील खडकी बाजार परिसरात चपलेचे गोडाऊन आहे. शनिवारी गोडाऊन बंद केल्यानंतर रात्री या तीन तरुणांनी गोडाऊनचे शटर फोडून आत प्रवेश केला. ते बूट आणि चपलांचे एकूण 55 जोड चोरी करून पसार झाले.