पुणे - पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कॅब चालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना मध्यरात्री पिंपरी-चिंचवड शहरात घडली. दशरथ भानुदास चारले (वय २४ वर्षे, रा.मोशी) यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने शस्त्राचा धाक दाखवून कॅब चालकाला लुटले
पिंपरी-चिंचवड येथील भोसरी एमआयडीसीच्या हद्दीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या दुचाकीस्वारांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत कॅब चालकाला लुटले आहे.
दशरथ हे त्या अज्ञात दुचाकीचा नंबर घेत असताना त्यांनी मोटारीची काचदेखील फोडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ हे कॅब चालक आहेत. मध्यरात्री ते मोशी बोऱ्हाडेवाडी येथे लघुशंका करण्यासाठी थांबले आणि लगेच मोटारीत बसले. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून जवळ आले. त्यांनी जवळ येताच दशरथ यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवला आणि १६ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच मोटारीतील पाकीट घेऊन पळून गेले. यावेळी दशरथ यांनी त्यांच्या दुचाकीचा नंबर घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील एकाने पाहिले आणि मोटारीची काच फोडली. याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बांबळे करत आहेत.