पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे येस बँकेत तब्बल ९८४ कोटी रुपये आहेत. आरबीआयने येस बँकेवर निर्बंध लागू केल्याने पालिका आर्थिक संकटात सापडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीयकृत बँकेतून खासगी बँकेत पैसे ठेवायचे काही कारण नव्हते. तो जनतेचा पैसा आहे. बँक अडचणीत आली तर पैसे कोण भरून देणार? असा सवाल करत पुढे काही अनुचित घडले तर महानगरपालिका चालविणारे याला जबाबदार असेल असे म्हटले आहे.
येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लागू केले आणि देशात खळबळ उडाली. मध्यरात्री पासूनच एटीएमवर रांगा लागल्या. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेनेही ९८४ कोटी ठेवी स्वरूपात येस बँकेत जमा केले आहे. हा पैसा आता येस बँकेत अडकून पडला आहे. मात्र, आरबीआयने येस बँकेवर लावलेल्या निर्बंधाचा महानगरपालिकेच्या ठेवींवर कुठलाही परिणाम पडणार नसल्याचे सांगितले आहे. असे असले तरी, बँक अडचणीत आल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.