पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर अजित पवार गटाने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो वापरू नये असे खुद्द शरद पवार यांनी सांगितले होते. अजित पवार गटाकडून शरद पवार यांचे फोटो वापरले जात होते. पण, कालपासून पवार यांचे फोटो वापरणे बंद केले आहे. यावरून राष्ट्रवादीत आता उभी फूट पडली आहे, असे स्पष्ट होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, पक्षात फूट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला आहे आणि त्याबाबत तक्रार आम्ही स्पीकरकडे केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. पक्षाचे देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष हे जयंत पाटील आहेत, असे स्पष्ट मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
राकॉंची भाजपसोबत युती नाही : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महापालिका आयुक्त यांची भेट घेत बारामती मतदार संघातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला आवाहन केले की, जनतेचे खूपच प्रश्न प्रलंबित असल्याने लवकरात लवकर महापालिकेच्या निवडणुका या घेण्यात याव्या. अजित पवार यांचा राष्ट्रवादीत दर्जा काय आहे, याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विरोधात काही वेगळी भूमिका घेतली आहे आणि त्याविरोधात तक्रार आम्ही स्पीकर यांच्याकडे केली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट बघत आहोत. आमच्या पक्षाची भाजपाबरोबर कुठलीही युती नाही आणि आघाडी देखील नाही, असे देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पक्ष फोडण्याचा अनेकदा प्रयत्न :एका वृत्तपत्रात पक्षफोडीबाबत जे विधान केलं आहे त्याबाबत त्या म्हणाल्या की, अनेकवेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष फोडण्याचा प्रयत्न हा झाला आहे. काही वेळेला अयशस्वी झाला तर काही वेळेस यशस्वी देखील झाला. भाजपसाठी साम, दाम, दंड, भेद वापरून सत्तेत येणं हेच महत्त्वाचं आहे. गेल्या दीड वर्षांत आपण सर्व पाहात आहोत की, कशा पद्धतीने या सरकारचं काम चाललं आहे.