महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील आरोग्य व्यवस्था 'व्हेंटिलेटर'वर, 'ऑक्सिजन'अन् खाटांच्या कमतरतेने कोरोनाग्रस्तांचे हाल - पुणे जिल्हा कोरोना बातमी

पुण्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. मात्र, त्या रुग्णांसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र सध्या पुण्यात पहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांसाठी लागणाऱ्या प्राणवायूची (ऑक्सिजन) मोठी कमतरता भासत असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कबूल केल आहे. ऑक्सिजनच्या कमतरेने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

जम्बो कोविड सेंटर
जम्बो कोविड सेंटर

By

Published : Sep 10, 2020, 10:27 PM IST

Updated : Sep 10, 2020, 10:54 PM IST

पुणे- देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेल्या पुण्यातील वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. गरजेनुसार ऑक्सिजन (प्राणवायू) मिळत नसल्याने ऑक्सिजन खाटा उपलब्ध होत नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे अनेक कोरोनाग्रस्तांना आपले जीव गमवावे लागले आहे. यामुळे पुण्याची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्यातील आरोग्य व्यवस्था 'व्हेंटिलेटर'वर

कोरोनाग्रस्त रुग्णांना श्वसनाचा त्रास सुरू होतो. त्यामुळे त्यांना कृत्रीमरित्या ऑक्सिजन द्यावे लागते. देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी जाहीर मान्य केले होते. तसेच केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत ही धक्कादायक बाब समोर आली होती. ऑक्सिजनचा योग्य तो पुरवठा व्हावा यासाठी पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केंद्रीय मंत्री जावडेकरांसमोर ही कैफियत मांडली होती. पुणे शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. आकडेवारी पाहिली तर चित्र भयावह आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 6 हजार 290 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत, तर 4 हजार 794 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 38 हजार 505 सक्रीय कोरोनाग्रस्त रुग्ण पुण्यात आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजनची समस्या मोठी आहे. जिल्ह्यात जवळपास 290 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत असला तरी तो कमी पडत आहे. मार्च ते 31 जुलै या पाच महिन्यात 2 हजार रुग्ण दगावले होते. पण, पुढील 37 दिवसातच दुपटीपेक्षा अधिक म्हणजे 4 हजार 794 रुग्ण दगावले आहेत. ही तुलना पाहता सद्यस्थितीला किमान 400 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर पुण्यात कोरोनाचा सामूहिक प्रादुर्भाव होत असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढतच जाणार असल्याचे चित्र असून त्या दृष्टीने यंत्रणा सक्रिय होणे गरजेचे आहे.

डॉक्टर आणि परिचारिका असून उपयोग नाही तर सध्याच्या घडीला पुण्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होणे गरजेचे आहे. अपुऱ्या सुविधा आणि औषधांची कमतरता यात आता ऑक्सिजनच्या तुटवड्याची भर पडली आहे. हव्या तितक्या ऑक्सिजनची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुण्याची आरोग्य व्यवस्था ही 'व्हेंटिलेटर'वरच असणार आहे.

रुग्णांना वेळेवर खाटा उपलब्ध होणे हे देखील महत्वाचे आहे. वेळेवर ऑक्सिजन खाटा मिळत नसल्याने रुग्ण दगावत असल्याची उदाहरणे अधिक आहेत. तसेच आयसीयू खाटाही उपलब्ध होत नसल्याने त्याबाबत आता ऑक्सिजन आणि आयसीयू खाटा या केंद्रीय पद्धतीने दिले गेले पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली असल्याचे पुण्याच्या महापौरांनी सांगितले आहे. सध्या ऑक्सिजन खाटा तसेच आयसीयू खाटांची कमतरता भासत असल्याचे ही महापौरांनी मान्य केले.

या सोबतच शहरात रुग्णवाहिका वेळेवर न मिळण्याची समस्याही मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. खासकरून कार्डियाक रुग्णवाहिकेचा प्रश्न मोठा आहे. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता, यावर मार्ग काढण्यात आला असून शहरात आता रुग्णवाहिकेची उपलब्धता असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, विरोधक हे रुग्णवाहिका मिळत नसल्याच्या तक्रारी करतात. मनसे नगरसेवकांनी तर रुग्णवाहिकेच्या मुद्द्यावर उपायुक्तांची गाडी फोडल्याची घटना घडली होती.

जिल्ह्यात आहेत 'इतक्या' रुग्णवाहिका

पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण 500 ते 600 रुग्णवाहिका आहेत. यात 100 रुग्णवाहिका पिंपरी-चिंचवड शहरात, 300 पुणे शहरात तर 50 ते 100 जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहेत. यात कार्डियाक रुग्णवाहिका फक्त 10 ते 15 आहेत. त्यामुळे या रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. एकंदरीतच एकीकडे दररोज वाढणारे कोरोनाग्रस्त रुगण तर दुसरीकडे या रुग्णांना उपचार घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे, असे चित्र पुण्यात आहे.

हेही वाचा -पिंपरी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पीपीई किट परिधान करून कोविड केंद्रात, रुग्णांची केली विचारपूस

Last Updated : Sep 10, 2020, 10:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details