पुणे (पिंपरी) -पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी परिसरात एका लेबर कॉन्ट्रॅक्टरचा मृतदेह बंद खोलीत आढळल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. छट पूजेला सुट्टी न दिल्याने ठेकेदाराचा कामगाराने खून केला असल्याचं निष्पन्न झाले आहे. ही घटना हिंजवडीमधील जांभे या ठिकाणी घडली होती.
गणपत सदाशिव सांगळे वय- 25, असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याने याबाबतची माहिती हिंजवडी पोलिसांना शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी दिली होती. त्यानंतर संबंधित घटना समोर आली. या प्रकरणी कामगार अरविंद नैपाल चौहान उर्फ यादव वय- 35, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे.
बंद खोलीत आढळला होता ठेकेदाराचा मृतदेह-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील जांभे येथे मयत ठेकेदार गणपत हा भाड्याच्या खोलीत राहत होता. 27 नोव्हेंबर रोजी त्याचा मृतदेह बंद खोलीत सडलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अवघ्या सहा तासातच गुन्हाचा छडा लावत ठेकेदारासोबत राहत असलेला कामगार हा गुन्हेगार असल्याच उघड झालं होतं. मात्र, त्याने उत्तर प्रदेश येथे पोबारा केला होता.
छट पूजेला सुट्टी न दिल्याने केला खून-
ठेकेदार गणपत यांच्याकडे आरोपी कामगार अरविंद हा काम करायचा. गेल्या आठवड्यात छट पूजा असल्याने त्याला गावी जायचं होतं. सुट्टी हवी आहे असं त्याने ठेकेदार गणपतला सांगितले. मात्र त्याला सुट्टी दिली नाही. याचा राग मनात धरून आरोपी अरविंदने ठेकेदार गणपतचा डोक्यात अवजड वस्तू मारून खून केला आणि पोबारा केला.