पुणे - जिल्ह्यातील बकोरी या छोट्याश्या गावातील ७५ वर्षीय आईसह संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली अन् सुरू झाली कोरोना विरुध्दची लढाई. बकोरी येथील सामाजिक क्षेञात काम करणाऱ्या निसर्गप्रेमी वारघडे कुटुंबातील एकामागून एक अशा पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी हार न मानता ७५ वर्षीय आईसह सर्वजण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
बकोरी येथील वारघडे कुटुंब कोरोनातून बरे झाले सकारात्मक विचार ठेवले -
आमच्या सर्वांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मला विश्वास बसत नव्हता. आम्ही सगळे रडायला लागलो. मला वाटलं आता माझं सगळं कुटुंब उद्धवस्त होईल. जेवणही जात नव्हते. मात्र, मी नंतर स्वत:ला आवर घातला. सर्वजण एकमेकांना मानसिक बळ देत राहिलो. आम्ही हरलो नाही तर लढलो आणि कोरोनातून बाहेर पडलो. डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेच एका पाठोपाठ एक वाघोलीतील रामकर रुग्णालयात दाखल झालो. खूप सकारात्मक विचार ठेवले. त्यामुळेच ७५ वर्ष वयाच्या आईसह आम्ही पाचही जण कोरोनामुक्त झालो, असे चंद्रकांत वारघाडे यांनी सांगितले.
वारघडे कुटुंबाने उदाहरण निर्माण केले -
सुरुवातीला माझी नात कोरोनाबाधित आढळली होती. त्यानंतर आम्ही सगळे कोरोनाबाधित झालो. मात्र, वाघोलीतील रामकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आज सगळेजण पूर्णतः बरे होऊन घरी परतलो आहोत, असे 75 वर्षीय आईने सांगितले. वारघडे कुटुंब दवाखान्यात दाखल झाले तेव्हा घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यांना आम्ही आधार दिला. त्यांना घरातल्या सारखे वातावरण दिले. संपूर्ण कुटुंबाने सकारात्मक विचार ठेवल्याने ७५ वर्षाच्या आईसह ते बरे झाल्याचे रामकर रुग्णालयातील डॉक्टर म्हणाले.