पुणे :पुणे शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने कोथरुड - पाषाण, सेनापती बापट रस्ता अशा तीन परिसरांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हे बोगदे वेताळ टेकडी फोडून बनविण्यात येणार आहे. याला पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शविला असून वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या माध्यमातून येत्या 15 एप्रिल रोजी 5 वाजता वेताळ बाबा चौकातून शांततेत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सर्व पुणेकर तसेच विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
वेताळ टेकडी नैसर्गिक वारसा : पुण्यातील पत्रकार भवन येथे वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होत. यावेळी विविध पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. बालभारती पौड रोड तसेच वेताळ टेकडी येथे होत असलेल्या कामामुळे येथे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. हे सर्व काम डीपीमधून डिलिट करण्यात यावे, तसेच वेताळ टेकडी हे नैसर्गिक वारसा आहे. त्यातच पुण्यातील हिरवळ कमी झाली आहे. हिरवे आच्छादन फक्त या टेकड्यांवर आहे. त्यामुळे तो खंडित होऊ नये. या टेकड्या जपल्या पाहिजेत, त्यासाठी आम्ही लढा देऊ, असे पर्यावरणतज्ज्ञ प्रदीप घुमरे यांनी सांगितले आहे.