पुणे- राज्यात कोरोनाचा धोका कमी होत असल्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता आणली गेली आहे. राज्यात याआधी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी देण्यात आली. दिवाळीनंतर शाळा सुरू होतील, अशी अपेक्षा असताना त्याआधीच शाळा सुरू झाल्या आहेत. आता पुण्यात येत्या 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरू होणार आहेत. तसे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढला आहे.
चालू सत्राचा अभ्यासक्रम विहित कालावधीमध्ये शिकवून पूर्ण करण्याची जबाबदारी प्राध्यापक - प्राचार्यांची
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठेशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग 20 ऑक्टोबरपासून सुरू करण्याबाबत सूचना पुणे विद्यापीठाने दिल्या आहेत. राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोरोनाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोरोना उपाययोजना नियम 2020 अमलात आलेले आहेत. विद्यापीठाच्या या परिपत्रकाद्वारे सूचनेनुसार शासनाने तसेच पुणे व पिपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे. तसेच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालय परिसंस्था यांनी जिल्हा प्रशासन, स्थानिक प्राधिकरण यांनी दिलेल्या आदेशानुसार महाविद्यालय सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी. चालू सत्राचा अभ्यासक्रम विहित कालावधीमध्ये शिकवून पूर्ण करण्याची जबाबदारी प्राध्यापक व प्राचार्य यांची राहणार आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहे.