महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन्यथा तीव्र आंदोलन करू, रयत क्रांती संघटनेचा इशारा - बारामती बातमी

कानगांव, गार, पाटस येथील नागरिकांना कामानिमित्त सतत बारामतीला ये-जा करावे लागते. पर्यायी मार्गावर सिमेंटचे बॅरिकेट्स असल्याने पाटस टोल नाक्याच्या हद्दीतील केवळ एक किलोमिटरचा रस्ता वापरतात. मात्र, यासाठीही या गावातील नागिरांकडून जाण्या-येण्याचे 150 रुपये टोल वसूल केला जातो. पर्यायी मार्ग सुरू करावा किंवा टोल आकारू नये, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

टोलनाका
टोलनाका

By

Published : Jan 12, 2021, 3:42 PM IST

Updated : Jan 12, 2021, 4:15 PM IST

दौंड (पुणे) -पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोल नाक्यावर बारामतीला जाण्यासाठी प्रतिकिलोमीटर 150 रुपये टोल आकारत वाहनधारकांची होणारी लुट थांबली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, रयत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

बोलताना शिंदे

प्रति किलोमीटर 150 रुपये इतका दर जगाच्या पाठीवर कुठेही नाही

पुणे-सोलापूर एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड यांचा पाटस येथे टोल नाका आहे. बारामती येथे अनेक शासकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, कृषी कार्यालय आहेत. त्यामुळे कानगांव, गार, पाटस येथील नागरिकांना सतत बारामतीला जावे लागते. बारामतीला जात असताना पाटस टोलच्या हद्दीत असलेला फक्त 1 किलोमीटर रस्ता वाहनधारक वापरतात. पण, त्यांना जाताना 75 रुपये व पुन्हा येताना 75 रुपये, असे केवळ एक किलोमिटरसाठी चक्क 150 रुपये टोल भरावा लागतो. प्रति किलोमीटर 150 रुपये इतका दर जगाच्या पाठीवर कुठेही नाही. त्यामुळे दिवसाढवळ्या नागरिकांची लूट अनेक दिवसांपासून होत आहे. याकडे टोल कंपनी, शासन व प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

बारामतीकडे जाण्यासाठी कंपनीने केला आहे पर्यायी रस्ता

पाटस उड्डाण पुलाखालून बारामतीला जाण्यासाठी उजवीकडून जाताना उजव्या बाजूस पर्यायी रस्ता कंपनीने केलेला आहे. पण, तो सिंमेंट बॅरिकेट्स टाकून बंद ठेवलेला आहे. त्यामुळे नागरिकांना टोल नाक्यामार्गेच जावे लागते. येथील नागरिकांना यवत ते भिगवणमार्गे बारामती जाणारा टोल आकारला जातो. तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. गावातील नागरिक रोटी वासुंदेमार्गे बारामतीला जाताना फक्त 1 किलोमीटरचा रस्ता वापरतात. तसेच सगळे फास्टट्रॅक व एक कॅश लेन असल्यामुळे अर्धा-अर्धा तास वाहनांच्या रांगेत थांबावे लागते. आजारी माणसे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

टोल प्लाझा प्रशासन व कामगार त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा

कानगाव, गार, पाटस येथील नागरिकांना पर्यायी असलेला वासुंदे मार्गे बारामती हा मार्ग त्वरित सुरू करावा. तसेच टोल प्लाझाकडून आत्तापर्यंत लूटलेले पैसे सरकारी तिजोरीत जमा करावे. तसेच संबंधित टोल प्लाझा प्रशासन व कामगार त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

हेही वाचा -भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय नाट्यानंतर आवास योजनेची सोडत रद्द

हेही वाचा -सिरममधून बाहेर पडणाऱ्या ३ कंटेनरची दुसरी फेरी रद्द होण्याची शक्यता

Last Updated : Jan 12, 2021, 4:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details