मावळ (पुणे)- राज्यात झालेल्या अतिवृष्टीने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचप्रमाणे मावळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने भातशेतीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मावळ हा भातशेतीचे आगार म्हणून ओळखले जाते. येथील बहुतांश शेतकरी हा भाताची लागवड करत असतो. यंदा भाताचे पीक जोमात आले आहे. मावळ तालुक्यात तब्बल 12900 हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या 15 दिवसात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे एकूण 1191 हेक्टर वरील भात शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आल्याच पाहायला मिळत आहे.
मावळमध्ये 2634 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; भात शेतीसह इतर पिकांचे मोठे नुकसान - मावळमध्ये भातशेतीचे मोठे नुकसान
मावळमध्ये 2634 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत; भात शेतीसह इतर पिकांचे मोठे नुकसान
1018 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे नुकसान-
मावळ तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने संपुर्ण तालुका जलमय झाला होता. नदी नाल्यांना पूर आल्याने मावळातील जिरायती व बागायती शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काळे काॅलनी विभागातील शेतकर्यांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. भाताचे आगार असा लौकिक असलेल्या मावळ तालुक्यातील 2456 शेतकर्यांच्या 1018 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. तसेच 46 हेक्टर क्षेत्रावरील भुईमूग पीक, 108 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, असा साधारण 1172 हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिकांचे अंदाजे 79 लाख 69 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर बागायती क्षेत्रापैकी 17 हेक्टर क्षेत्रावरील ऊस, 2.30 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला अशा अंदाजे 19.30 हेक्टर क्षेत्र असलेल्या 49 शेतकर्यांचे 6 लाख 61 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे.