पुणे -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व मंदिरे बंद असल्याने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत त्याचा परिणाम कीर्तनकारांवर झाला आहे. या काळात गावोगावी असणाऱ्या जत्रा-यात्रा रद्द झाल्याने कीर्तनकारांची कमाई बंद झाली आहे. आगामी वर्ष कसे काढायचे? असा प्रश्न आता या किर्तनकारांना पडला आहे.
लॉकडाऊनचा धार्मिक कार्यक्रमांनाही फटका; किर्तनकारांनपुढे मोठी आर्थिक अडचण - किर्तनकार आर्थिक अडचण
राज्यातील सर्व मंदिरे बंद असल्याने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत त्याचा परिणाम कीर्तनकारांवर झाला आहे. या काळात गावोगावी असणाऱ्या जत्रा-यात्रा रद्द झाल्याने कीर्तनकारांची कमाई बंद झाली आहे. आगामी वर्ष कसे काढायचे? असा प्रश्न आता या किर्तनकारांना पडला आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्यातील विविध गावांमध्ये यात्रा भरवण्यात येतात. या यात्रांच्या निमित्ताने निरनिराळ्या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम होत असतात. महिना ते दिड महिना चालणाऱ्या या यात्रांमुळे किर्तनकारांना सुद्धा चांगले पैसे मिळतात. या पैशातील पुढील सहा महिने त्यांचे घर-संसार चालत असतात. मात्र, कोरोनामुळे हे सगळे आर्थिक गणित बिघडून गेले आहे.
या दोन महिन्यात निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रम करून जी बिदागी मिळते त्यातून आमचे सहा ते आठ महिने घर चालू शकते. यावर्षी एकही कार्यक्रम झालेला नाही. पावसाळ्यात कीर्तनाचे कार्यक्रम होत नाहीत. त्याचबरोबर दिवाळीनंतर सुद्धा अगदी डिसेंबरमध्ये म्हणजे दत्त जयंतीच्या सुमारास आम्हाला कार्यक्रम मिळतात. म्हणजे तोपर्यंत काहीच उत्पन्नाचा काहीच मार्ग नाही, अशी माहिती कीर्तनकार संघाचे सदस्य श्रेयस बडवे यांनी दिली.