पुणे (इंदापूर) -चार वर्षांपासून एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाचे रूपांतर लग्न बंधनात होईल. असे स्वप्न पाहिले. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लग्न करण्याचेही ठरले. मात्र, ऐनवेळी प्रियकरच लग्न मंडपातून पळून गेला हे कमी की काय म्हणून मुलाच्या मामाने मुलीला विषारी पेढा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या राजवडी येथे घडला. ( Lover left Away On The Wedding Day ) याप्रकरणी प्रियकरासह त्याचा मामा व मावसभाऊ अशा चौघाविरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल मधुकर कदम, संतोष सुखदेव गलांडे, अकुंश सुखदेव गलांडे, स्वप्नील दत्तात्रय शिंगटे (सर्व रा. गलांडवाडी नं.१, ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
एकत्र बसून काहीतरी मार्ग काढू - इंदापूर तालुक्यातील 24 वर्षीय युवती येथील एका महाविद्यालयात इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगचा कोर्स करत आहे. तिच्या महाविद्यालयाजवळच असणाऱ्या राजवडी गावातील एका दुध डेअरीत काम करत असणाऱ्या हर्षल कदम याच्याबरोबर तिचे मागील काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. (दि. १५ जुलै)रोजी युवतीचे वडील, हर्षलचे मामा संतोष सुखदेव गलांडे, अकुंश सुखदेव गलांडे यांनी (दि. ३१ जुलै)रोजी इंदापूरातील सिध्देश्वर मंदिरात त्या दोघांचे लग्न करण्याचे ठरवले. दोन्ही मामांनी 5 लाख रुपये हुंडा मागितला. हे सर्व ठरले असताना ऐन लग्नाच्या दिवशी हर्षल घरातून कोठेतरी निघून गेला. त्यामुळे हे लग्न आता होवू शकत नाही, असे त्याच्या मामांनी युवतीच्या वडीलांना सांगितले. दुसऱ्या दिवशी राजवडी गावात एकत्र बसून काहीतरी मार्ग काढू असे सांगून ते निघून गेले.