पुणे -सध्या डावे लोकच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. सुरुवातीच्या काळात आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी होते. मात्र, ते निघून गेले आहेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोणावळ्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच, शेतकऱ्यांसोबत केंद्रसरकार संवाद साधत आहे. संवादातून प्रश्न सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माहिती देताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेही वाचा -पुणे-बंगळूर महामार्गावर एकापाठोपाठ पाच अपघात; चार ठार, आठ जखमी
केंद्र सरकार सर्व मागण्या मान्य करत असताना केवळ या ठिकाणी हे आंदोलन चालले पाहिजे या हेतूने काही लोक प्रयत्न करत आहेत. हे शेतकऱ्यांनाही कळले आहे. केंद्रसरकार चर्चेतून हा विषय मार्गी लावणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
सरकार भडाऱ्यातील रुग्णालयाच्या गरजा पूर्ण करू शकली नाही
भंडाऱ्यातील ज्या रुग्णालयात आग लागली होती. त्या रुग्णालयाने आग सुरक्षा उपकरणांसाठी मे २०२० मध्ये दीड कोटी रुपयांची मागणी केली होती. सहा महिने हे सरकार त्याच्यावर काही करू शकले नाही. मात्र, विकासकांचे प्रश्न आले तर धाव-धाव करतात. ही बाब सामनाला दिसत नाही. केवळ प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर कधी टाकता येईल हे ते पाहतात. त्यामुळे, अशा प्रकारचा प्रयत्न हास्यास्पद आहे, असंवेदनशील आहे. रुग्णालयाचे ऑडिट झाले पाहिजे. दुसरे, दोषींवर कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री जाऊन आले आहेत, तर कारवाईची अपेक्षा होती. मात्र, तसे होताना दिसत नाही. पीडितांना वाढीव मदत होण्याचेही चिन्ह नाही, असे फडणवीस म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष असताना देखील एक सिक्युरिटी गार्ड नव्हता
सुरक्षा काढण्याचा आणि ठेवण्याचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे, त्याची काही चिंता नाही. आम्ही बिना सुरक्षेचे फिरणारे लोक आहोत. आहे तेवढी सुरक्षा बस आहे. ती ही ठेवली नाही तरी अडचण नाही. प्रदेशाध्यक्ष असताना देखील एक सिक्युरिटी गार्ड नव्हता. तेव्हा गडचिरोलीला आणि इतर ठिकाणी जायचो. आजही शंभर टक्के एकही गार्ड दिला नाही तरी संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकतो. त्यामुळे, आमची कुठलीच तक्रार नाही, आक्षेप नाही. चंद्रकांत पाटील म्हणाले, जे काही गार्ड काढले ते महिलांच्या सुरक्षेसाठी उपयोगी आणा. यासारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भंडारासारख्या घटनेवर सरकारने लक्ष दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
नथुराम गोडसेचे समर्थन होऊ शकत नाही
नथुराम गोडसेचे समर्थन या देशात कोणी करू शकत नाही. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ज्याने खून केला अशा व्यक्तीचे महिमा मंडण होऊ शकत नाही. असे कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचे आहे. त्याचे समर्थन होणार नाही.
शिवसेना निवडणुकी डोळ्यासमोर ठेऊन गुजराती समाजाला जवळ करत आहे. मला याचा आनंद आहे की, गुजराती समाजाला निवडणुकीकरिता का होईना जवळ करण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला शिवसेना विरोध करत आहे. दुरीकडे गुजराती समाजाला जवळ करू, असे म्हणत आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे कोणी जवळ येत नाही. तुमच्या कृतींमुळे लोक जवळ येतात. निवडणुका आल्यानंतर आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे देखील जनाब बाळासाहेब ठाकरे झाले आहेत. उर्दूमध्ये शिवसेनेचे कॅलेंडर निघत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने नाटक नौटंकी चालली आहे. पण, लोकांना समजते ही नौटंकी कशासाठी आहे.
बर्ड फ्ल्यू हे मोठे संकट
बर्ड फ्ल्यू हे गंभीर संकट आहे. पाच राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यू आढळला आहे. महाराष्ट्रातूनही काही घटना बाहेर येत आहेत. हे एक मोठे संकट आहे. लॉकडाऊनमुळे कुकुट पालन करणाऱ्यांवर फार विपरित परिणाम झाला होता. बर्ड फ्ल्यूमुळे खूप मोठ्या प्रमाणात कारवाई देखील करावी लागेल. तशा प्रकारचे संकेत मंत्री मोहोदयांनी दिले आहेत. एकीकडे वेगाने कारवाई करावी लागेल आणि दुसरीकडे हे जे काही उद्योजक आहेत त्यांना मदत करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा -दौंड येथील तरुणाची भरारी; अंजिराच्या शेतीतून लाखो रुपयांची उलाढाल