पुणे - शहरात 13 फेब्रुवारीपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. 13 फेब्रुवारीला पुण्यात 1 हजार 250 सक्रिय रुग्ण होते. आणि आता सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांचा आकडा 46 हजारांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे मागील पन्नास दिवसांत खूप वेगाने शहरात कोरोनाचा प्रसार झाला आहे. यातील समाधानाची बाब अशी की, 46 हजार पैकी 39 हजार रुग्ण घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यांना फार सौम्य लक्षण आहेत. पुणे महापालिका हेल्पलाईनद्वारे अशा रुग्णांच्या संपर्कात असल्याचे पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले. ते आज (दि. 8 एप्रिल) पत्रकार परिषद घेत पुण्यातील सध्याची कोरोनाची स्थिती आणि त्यावर महापालिका करत असलेल्या उपाययोजना याची माहिती दिली.
शहरातील साडेसहा हजार कोरोनाग्रस्त रुग्णालयात घेताहेत उपचार
शहरातील साडेसहा हजार कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. यातील 550 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. अंदाजे चार हजार रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. सद्यस्थितीत पुणे शहरातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयात दररोज वीस हजार जणांच्या कोरोना चाचण्या केल्या जातात. यातून दररोज साडेपाच ते सहा हजार कोरोना चे रुग्ण आढळतात. आजही शहरात रुग्ण वाढीचा वेग 26 ते 28 टक्के इतका आहे, हे चिंताजनक आहे. कोरोनावाढीचा हा वेग कमी कसा करता येईल यावर महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.