पुणे - आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीसोबत रुग्णालयातच लग्न करून नतंर तरुण फरार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी चाकणमध्ये घडली. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या विरोधात चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या तरुणाने लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
प्रेम, आत्महत्येचा प्रयत्न, अतिदक्षता विभागात लग्न आणि.... हेही वाचा- हैदराबाद बलात्कार प्रकरण: जाणून घ्या मुंबईतील तरुणींची मतं...
मूळची बुलडाणा जिल्ह्यातील सध्या चाकण येथील आंबेठाण चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या 26 वर्षीय पीडित तरुणीची सूरज नलावडे नावाच्या व्यक्तीसोबत गेल्या वर्षी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे सूरज हा नेहमी तिच्या संपर्कात राहायचा. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. या काळात संबंधित तरुणीने सूरजकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, एका जातीचे नाही, असे सांगत तो तिला भेटण्याचे टाळू लागला.
त्याने लग्नाला नकार दिल्याने तरुणीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, याबाबत काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना माहिती मिळाल्यानतंर त्यांनी संबंधित तरुणाला रुग्णालयात आणून चक्क अतिदक्षता विभागात या दोघांचे लग्न लावून दिले. मात्र, लग्नाचे सोपस्कार पार पडताच तरुणाने तिथून धूम ठोकली. या प्रकरणी बुधवारी पोलिसांनी सूरज भारत नलावडे याच्यावर बलात्कार व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.