पुणे :ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं ऋषी सुनक हे पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. काही दिवसांमध्येच 5 ते 8 हजार पुस्तकांची विक्री झाली असून तरुणांचे या मराठी माणसावर लिहिलेल्या पुस्तकाकडे कल जास्त दिसून आला आहे. पत्रकार दिगंबर दराडे हे पत्रकारिता बरोबरच विविध विषयांवर अभ्यास देखील करत आहे. त्यांनी लंडन येथे जाऊन सुनक यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकाला ऑनलाईन देखील युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक :ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती, सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येते. एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे, गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयांना त्यांचा अभिमान वाटतच आहे. हीच बाबी दराडे यांनी आपल्या पुस्तकात मांडली आहे.