पुणे : Shiv Sena MLA Disqualification : सुमारे दीड वर्षापासून सुरू असलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल अखेर आज बुधवार (10 जानेवारी)रोजी लागला. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असून, 16 आमदारही पात्र असल्याचा निकाल अध्यक्षांनी दिलाय. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, आजच्या निकालाबाबत जेव्हा आम्ही चर्चा करत होतो, तेव्हा आजचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असं वाटत नव्हतं. मुख्यमंत्र्यांना हा निकाल त्यांच्या बाजूने लागेल हा आत्मविश्वास होता. जो निकाल लागला आहे, ते पाहता उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. तिथे त्यांना न्याय मिळेल असं आजच्या निकालावरून वाटतय असं पवार यावेळी म्हणालेत.
सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे बदलली : विधिमंडळापेक्षा, पक्ष संघटना महत्वाची असते हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. मात्र, विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेगळा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालानुसार व्हीप बजावण्याचा अधिकार पक्ष संघटनेला असतो. विधिमंडळाला नाही. नार्वेकरांनी दोन्ही बाजूंना पात्र ठरवलंय. नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाची गाईड लाईन बदललीय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना संधी आहे. उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल असं पवार म्हणालेत.
नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला जात असतील तर निकाल स्पष्ट होता : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिले आहेत. या निकालाचा आमच्यावर परिणाम होणार नाही. नार्वेकर यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली आहे हे सांगण्याची संधी आम्हाला महाविकास आघाडीला प्राप्त झालीय. आम्ही तो कार्यक्रम लवकरच सुरु करू, असंही यावेळी पवार म्हणालेत. तसंच, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना हे लोकांना माहीत आहे. निकाल दोन दिवसांवर आला असताना नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला जात असतील तर निकाल स्पष्ट होता. त्यामुळे इतरांच्या बाबतीत देखील असाच निकाल येईल अशी शक्यता आहे असंही ते यावेळी म्हणाले.