पुणे : पुणे शहर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आहे. मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान तसेच मोहम्मद युनूस मोहम्मद हे पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात एटीएसने केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवादविरोधी पथकाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आज पुण्यात दाखल झाले आहेत. या दोन्ही दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी 18 जुलै रोजी पुण्यातून अटक केली होती. हे दोघेही बॉम्बस्फोट प्रशिक्षणासाठी सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलात गेले होते.
दोन दहशतवाद्यांना अटक :पुण्यातील कोथरूडमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. रात्री गस्त घालत असताना पोलिसांना दोन आरोपी गाडी चोरताना सापडले होते. नंतर ते दहशतवादी असल्याचे उघड झाले. त्यांचा ताबा आता एटीएसकडे देण्यात येणार आहे. हे दहशतवादी कुख्यात दहशतवादी आणि लष्कर-ए-तैयबाचा कमांडर फयाज काग्झीला फॉलो करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. काग्झीचा महाराष्ट्रासह देशात विविध देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याचे आढळून आले आहे.
पुण्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण : एप्रिलमध्ये पुण्यातील एका शाळेत दहशतवादी बनण्याचे प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील एका शाळेच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर एनआयएने चौथा आणि पाचवा मजला सील केला आहे. या मजल्यांवर देशविरोधी कारवाया सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
एक साथीदार अद्याप फरार :हे दोन दहशतवादी आयएसआयएसच्या सुफा संघटनेचे आहेत. मार्च २०२२ मध्ये याच तीन आरोपींना पोलिसांनी राजस्थानमधील चित्तोडगड येथून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. बॉम्ब बनवण्यासाठी वापरलेली पावडरही जप्त करण्यात आली होती. त्यांच्या अटकेसाठी ५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तो गेल्या 15 महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवादी लपून बसले होते. अखेर यातील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे.
हेही वाचा -Pune Crime News: 'त्या' दोन सुफा दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांकडून ड्रोनचे साहित्य जप्त; संवेदनशील ठिकाणी स्फोट करण्याचा होता डाव