पुणे -बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ आज सकाळी 9 वाहनांचा भीषण अपघात झाला. यामध्ये एक ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकने धडक दिल्यामुळे एक पिकअप टेम्पो थेट बाजूच्या दरीत जाऊन कोसळून पडला. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
पुण्यात भीषण अपघात : ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून 8 वाहनांना धडक, 1 ठार 5 जखमी - पुणे विचित्र अपघात
कात्रज ते नवले पूल दरम्यान सकाळी साडेदहा वाजता ऑर्किड स्कूलजवळ मोठा अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कात्रज नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने समोर येणाऱ्या आठ ते दहा वाहनांना त्याने धडक दिली. या अपघातात काही वाहने रस्त्याच्या कडेला फेकली गेली. यातील एक दुचाकी तर ट्रकच्या खाली आली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर, पाच जण जखमी झाले.
जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढण्याचे काम सुरू असून वाहतूक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने वळविण्यात आली आहे.
दरम्यान एक रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. महामार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण एकाच बाजूवर येऊन पडल्यामुळे काही मीटर अंतर कापण्यासाठी तासनतास लागत आहे.