महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्षक दिन : कोरोनाच्या संकटातही वाबळेवाडीच्या गुरुजनांचे ज्ञानदान; 'ग्रुप होम स्कूल'चा यशस्वी प्रयोग - teachers day

कोरोनाच्या महामारीचे संकट डोक्यावर असतानाही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून शिक्षकांच्या मार्गदर्शनातून वाबळेवाडी शाळेत चालवलेली शिक्षण प्रणाली देशातील प्रत्येक शाळांसमोर आदर्श ठेवणारीच आहे. शिक्षक दिनानिमित्त शिक्षणाची नाळ घट्ट पकडून ठेवणाऱ्या शिक्षकांना ईटीव्ही भारतचा सलाम..!

teachers day
शिक्षक दिन : कोरोनाच्या संकटातही वाबळेवाडीच्या गुरुजनांचे ज्ञानदान; 'ग्रुप होम स्कूल'चा यशस्वी प्रयोग

By

Published : Sep 5, 2020, 6:30 AM IST

Updated : Sep 6, 2020, 3:08 PM IST

शिरूर (पुणे) - जीवनाला दिशा देण्यात आणि माणसाच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात आहे. विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो भारतात शिक्षक दिन ५ सप्टेंबरला साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली.

आजपर्यंत देशात अनेक आदर्श शिक्षकांची उदाहरणे निर्माण झाली. अशाच पद्धतीने पुण्यातील शिरूरमधील वाबळेवाडी या गावातील जिल्हा परिषदेची शाळाही शिक्षकांच्या मेहनतीमुळे आणि दूरदृष्टीमुळे जागतिक स्तरावर चमकली आहे. कोरोनाच्या संकटातही विविध मार्गांनी या शाळेने शिक्षण देण्याची परंपरा सुरूच ठेवली. येथील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मोठे परिश्रम घेत आहेत. चला.. शिक्षक दिनानिमित्त शाळेच्या कामगिरीवर टाकूया एक नजर...

कोरोनाच्या संकटातही वाबळेवाडीच्या गुरुजनांचे ज्ञानदान; 'ग्रुप होम स्कूल'चा यशस्वी प्रयोग

हेही वाचा -जगासमोर आदर्श ठेवणारी जिल्हा परिषदेची 'झिरो एनर्जी शाळा'

भारतातील पहिली आणि जगातील तिसरी झिरो एनर्जी शाळा म्हणून शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषदेची शाळा आदर्श मॉडेल ठरली आहे. राज्यातील पहिली टॅबलेट शाळा होण्याचा मानही याच शाळेला मिळाला आहे. 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा' असे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला आलेल्या शाळेचे या नाव आहे. मॉडेल म्हणून वाटचाल करत आहे.

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेले 50 ते 60 घरांचे वाबळेवाडी छोटसे गाव आहे. या गावची लोकसंख्या चारशेच्या आसपास आहे. दोन गळक्या खोल्या,पडक्या भिंती अशी या गावची सहा वर्षापूर्वीची शाळा होती. याच शाळेत मुले शिक्षणाचे धडे गिरवत होते. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने ही शाळा उभा करत शाळेचा कायापालट केला. आज हीच शाळा जगातील शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणास्थान बनली आहे.

हेही वाचा -विशेष : 30 गावातील 434 विद्यार्थ्यांचे 'ग्रुप होम स्कूल'मधून ज्ञानार्जन; वाबळेवाडी शाळेचा यशस्वी प्रयोग

या शाळेच्या काचेच्या खोल्या पाहून परदेशातले एखादे हॉटेल आहे असे वाटते. ही देखणी वास्तू साकारण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींग आणि बँक ऑफ न्यूयॉर्कची मोलाची मदत झाली आहे. ही शाळा राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिली झिरो एनर्जी शाळा ठरली आहे.

जिल्हा परिषदेच्या या शाळेच्या वर्गखोल्या पूर्णतः काचेच्या असून 22 फूट रुंद, 22 फूट लांब आणि 24 फूट उंच आहे. या सर्व खोल्या पर्यावरणपूरक आहेत. या वर्ग खोल्यांमध्ये प्रकाशाचे विस्तारीकरण होत आणि हवाही खेळती राहते. शिवाय झिरो एनर्जी खोलीला देखभाल आणि दुरुस्तीची गरज लागत नाही. या ठिकाणी विद्यार्थी नुसते शिकतच नाहीत तर, अभ्यासाबरोबर मुलांच्या सर्वांगीण विकासावरही येथे भर दिला जातो. शिवाय, येथे सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर शिक्षकांची संख्या कमी पडू लागली होती. तेव्हा वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी लहान मुलांना शिकवण्यास सुरुवात केली होती.

या जिल्हा परिषद शाळेमध्ये पुढील दोन वर्षांचे प्रवेश पूर्ण झाले असून चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत. तर दुसरीकडे या शाळेचा दर्जा आणि शिक्षण पद्धती पाहण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून शिक्षक, अधिकारी, पालक शाळेला भेटी देत आहेत. अनेक राज्य सरकारे झिरो एनर्जी स्कूलचे मॉडेल आपल्या राज्यात राबवण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, यासाठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी झूम-मीटिंग अ‌ॅप्लिकेशनद्वारे दररोज तीन तासांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले.

हेही वाचा -दत्तात्रय वारे गुरुजींचा परिसस्पर्श, घडवली देशातील पहिली 'झिरो एनर्जी' शाळा

इयत्ता सहावी ते नववीच्या वर्गांतील ११६ विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन शिक्षण पद्धतीत सहभाग नोंदवला. दिवसातून तीन वेळा हे ऑनलाईन वर्ग सुरू केले. सर्व विद्यार्थी एकाच प्लॅटफॉर्मवर येऊन ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू करण्यासाठी झूम-मीटिंग अ‌ॅप्लिकेशनची चाचणी यापूर्वीच घेण्यात आली होती. त्यानुसार सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आयडी आणि पासवर्ड काढून वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याशिवाय, शाळेकडून 'विषय मित्र' आणि 'ग्रुप होम स्कूलींग' या संकल्पनाही राबवण्यात आल्या. शाळेच्या वारे गुरुजींच्या संकल्पनेतून आलेला हा यशस्वी प्रयोग समोर आला. यात विद्यार्थीच शिक्षक बनून लहान वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत आहेत.

शाळेत येणा-या 30 गावांतील 434 विद्यार्थ्यींना घराजवळील त्यांच्याच गावात 34 ठिकाणी ग्रुप-होम-स्कूलींगच्या माध्यमातून शिक्षण सुरू करण्यात आले. यामध्ये व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. यामध्ये पालकांनीही उस्फुर्तपणे सहभाग घेतला. यामुळे मुलांच्या शिक्षणाचा अडथळा दूर झाला.

कोरोनाच्या महामारीचे संकट डोक्यावर असतानाही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून शिक्षकांच्या मार्गदर्शनातून वाबळेवाडी शाळेत चालवलेली शिक्षण प्रणाली देशातील प्रत्येक शाळांसमोर आदर्श ठेवणारीच आहे. शिक्षक दिनानिमित्त शिक्षणाची नाळ घट्ट पकडून ठेवणाऱ्या शिक्षकांना ईटीव्ही भारतचा सलाम..!

Last Updated : Sep 6, 2020, 3:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details