अमरावती -अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी प्रशाकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. 1 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असून या संपूर्ण प्रक्रियेसाठी 963 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
27 उमेदवार, 35 हजार 622 मतदार
1 डिसेंबरला सकळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 35 हजार 622 असून त्यात 26 हजार 60 पुरुष आणि 9 हजार 562 महिलांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी असे आहे मनुष्यबळ
अमरावती विभागात 77 मतदान पथकांबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी तीन या प्रमाणे 15 राखीव पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण 963 मनुष्यबळात 27 झोनल अधिकारी, 77 मतदान केंद्राध्यक्ष, 231 मतदान अधिकारी, 154 पोलीस कर्मचारी, 92 सुक्ष्म निरीक्षक, 231 आरोग्य कर्मचारी, 92 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
मतपत्रिकांची छपाई पूर्ण
मतपत्रिका गुलाबी रंगाची आहे. एकूण 42 हजार 600 पत्रिका छापण्यात आल्या आहेत.
टपाली मतपत्रिकांची सुविधा
टपाली मतपत्रिकांसाठी 27 दिव्यांग मतदारांनी मागणी केली आहे. त्यांना मतपत्रिका टपालाने व विशेष पथक नेमून पुरविण्यात आल्या आहेत. टपाली मतपत्रिका 3 डिसेंबरला मतमोजणी केंद्रावर सकळी 8 पूर्वी टपाल खात्यामार्फत किंवा वैयक्तिकरित्या स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.