पुणे- राज्यातील मोठ्या शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व सुरक्षित करण्यावर राज्य शासन भर देणार आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यात मेट्रो महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-'बँक शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर सरकार गंभीर निर्णय घेईल'
पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट या पाच किलोमीटर भुयारी मार्गासाठी चार टीबीएम मशीन वापरण्यात येणार आहे. महामेट्रोच्यावतीने आयोजित पुणे मेट्रोच्या भुयारी कामासाठीच्या 'मुळा' दुसऱ्या टीबीएम मशिनचे अनावरण व कामाचा शुभारंभ आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अनिल भोसले, महामेट्रोचे संचालक सुब्रमण्यम रामनाथ, अतुल गाडगीळ, विनोदकुमार अग्रवाल, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बालताना शिंदे म्हणाले की, पुण्यातील मेट्रोचे काम लवकरात-लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. हे काम कठीण आणि आव्हानात्मक असले तरी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्यामुळे अडचण येणार नाही. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर वेळेची व इंधनाची बचत होण्याबरोबरच वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. महामेट्रोने मेट्रोचे काम गतीने आणि दर्जेदार पद्धतीने करावे. हे काम निर्देशित वेळेत पूर्ण करून महामेट्रोने नागरिकांना त्याचा आनंद द्यावा. दळणवळण व्यवस्था चांगली असेल तर राज्याचा विकास गतीने होतो. यासाठी येत्या काळात राज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्न केले जाणार आहेत.
'मुळा' हे दुसरे टीबीएम मशीन दाखल
पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा टप्पा भुयारी मार्गाचा आहे. या पाच किलोमीटर भुयारी मार्गासाठी चार टीबीएम मशीन वापरण्यात येणार आहेत. यापैकी 'मुळा' या पहिल्या टीबीएम मशीनने 31 नोव्हेंबर 2019 रोजी कृषी महाविद्यालय पटांगण येथून बोगद्याचे काम सुरू केले आहे. महामेट्रोकडे 'मुळा' हे दुसरे टीबीएम मशीन दाखल झाले असून या कामाचे उद्घाटन आज नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.
जागतिक दर्जाचे अद्ययावत टीबीएम मशीन
पुणे शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोगद्याचे काम सुरू होत असून एकूण चार टीबीएम द्वारे साधारणपणे दहा किलोमीटर लांबीचा बोगदा बनवण्यात येत आहे. पुणे मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महामेट्रोने जागतिक दर्जाच्या अद्यावत टीबीएम मशीन पाचारण केले आहे. हे टीबीएम मशीन जपान इन्फ्रास्ट्रक्चर (जेआयएस) आणि ऑस्ट्रेलियन स्टँडर्ड (एएस) या जागतिक मानांकनानुसार आधारित असून त्याचा व्यास ६.६५ मीटर आणि लांबी १२० मीटर आहे. हे अवजड मशीन २१० के डब्ल्यूच्या सहा विजेवर चालणाऱ्या मोटारींद्वारे चालवले जाते.
दोन स्वतंत्र भुयारी मार्ग बनवण्यात येणार
टनेल बोरिंग मशीन जसजसे पुढे सरकते तसतसे या मशिनच्या मागील यंत्रणा सिमेंट काँक्रीटच्या बनविलेल्या रिंगची स्थापना करत जाते. तसेच रिंग आणि भुयार यामध्ये सिमेंट काँक्रिटचा भरणा करण्यात येतो. अशाप्रकारे भुयारात काँक्रीटच्या प्री कास्ट रिंगचे आच्छादन बिछवण्यात येते. या अत्याधुनिक टीबीएम मशिनद्वारे जमिनीखाली सिमेंट काँक्रीटची एकप्रकारे नळी तयार होते व या नळीमध्ये रेल्वेरूळ टाकून त्यावर मेट्रो धावते. मेट्रोचे जाणारे व येणारे असे दोन स्वतंत्र भुयारी मार्ग बनवण्यात येणार आहेत.
मशीन 24 तासात 8 ते 10 मीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण करणार
पुणे मेट्रोने निवडलेले टीबीएम हे संगणकाद्वारे नियंत्रित अत्याधुनिक टीबीएम मशीन आहे. यामध्ये सुरक्षा संबंधी जागतिक दर्जाची प्रणाली वापरण्यात आली आहे. टनेलमध्ये हवेचा दाब व ऑक्सिजन, कार्बनडायऑक्सााईड आणि इतर वायू यांचे सेन्सर लावण्यात आले आहेत. टनेल व्हेंटिलेशन प्रणालीद्वारे यावर नियंत्रण ठेवण्यात येते. हे मशीन 24 तासात 8 ते 10 मीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण करू शकते.
घरांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही
भुयारी मार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी भूपृष्ठावरील घरे आणि बिल्डिंगच्या कंडिशनचा सर्व्हे पूर्ण करण्यात येतो. या सर्व्हेमध्ये भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंना ५० मीटर भूभागावरील प्रत्येक घराच्या प्रत्येक भिंतींचा फोटो व व्हिडीओ काढून ते घर मालकांना देण्यात येतात, जेणेकरून या मशिनमुळे घराला इजा पोहोचली का, याची शहानिशा करण्यात येते. पुणे मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येणारे टीबीएम मशीन अत्याधुनिक असल्यामुळे भूपृष्ठावरील घरांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचत नाही.