पुणे Tanaji Sawant On Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण असा संघर्ष उभा ठाकला आहे. त्यातच आता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मागच्या दोन वर्षात आरक्षण का गेलं हे कोणी विचारत नाही. मागच्या दोन वर्षात आंदोलन का उभी केली गेली नाहीत. असं म्हणत त्यांनी एक प्रकारे आरक्षणावरच प्रश्न निर्माण केला आहे.
आरक्षण का टिकवता आलं नाही : पाहिलं आरक्षण रद्द झाल्यानंतर वर्ष दोन वर्षे कोणीच काही बोललं नाही. अचानक एक वादळ यावं असं चाललेलं आहे. आरक्षण कधी मिळेल हे सांगायला मी काही पंचांग घेऊन बसलो नाही. हा लढा आहे. काही बाबी कायदेशीर आहेत. आज एका पद्धतीने शासनाची दमछाक करून आताच्या आताच आरक्षण द्या, कागदावर लिहून द्या अशी भूमिका घेतली जात आहे. पण आरक्षण टिकलं पाहिजे ते महत्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आरक्षण दिलं होतं. तत्कालीन सरकारला सुप्रीम कोर्टात का टिकवता आलं नाही? अशी प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली आहे.
राजीनामा देणार का :तानाजी सावंत यांनी 2024 पर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर मी राजीनामा देणार असं म्हटलं होतं. या वक्तव्यावर ते ठाम आहेत का? असा प्रश्न केला असता, बघू आता 2024 आणखी पुढे आहे. सरकार काम करत आहे आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत आहे. असं म्हणत त्यांनी एक प्रकारे आरक्षणावर राजीनामा देण्यास ठाम असल्याचं वक्तव्य टाळलेलं आहे.