पुणे :टोलनाक्यावर तामिळनाडूच्या ट्रक चालकाने टोलच्या कर्मचाऱ्याला तब्बल 12 किमी फरफटत नेल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना पुणे सातारा महामार्गावर खेड शिवापूर टोल नाक्यावर शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. तामिळनाडूच्या ट्रक चालकाने टोल कर्मचाऱ्याला फरफटत नेल्यामुळे पुणे सातारा महामार्गावर हा जीवघेणा थरार नागरिक पाहत होते. त्यामुळे नरसापूर गावातील नागरिकांनी या टोल कर्मचाऱ्याची सुटका केली. यावेळी गावकऱ्यांनी या ट्रक चालकाला चांगलाच चोप दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
टोलच्या पैशावरुन झाला वाद :तामिळनाडूचा ट्रक चालक आपला ट्रक ( क्रमांक टीएन 48 बीसी 6280 ) घेऊन पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवपुरी येथील टोल नाक्यावर आला होता. यावेळी ट्रक चालकाला टोल नाक्यावर असलेल्या कर्मचारी सौरभ कोंडे याने गाडी ओव्हरलोडेड आहे का अशी विचारणा केली होती. यावेळी सौरभ कोंडे गाडीवर चढताच ट्रक चालकाने ट्रक सुसाट पळवला. त्यामुळे टोल कर्मचारी सौरव कोंडे हा ट्रकवर तसाच लटकून होता. पुणे सातारा महामार्गावर हा जीवघेणा थरार रस्त्याने जाणारे प्रवासी पाहात होते. मात्र ट्रक सुसाट असल्याने सौरव कोंडेला वाचवण्यासाठी कोणीही धजावत नव्हते.