पुणे -स्विगी या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीच्या कामगारांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय व विविध मागण्यांसाठी मनसेकडे दाद मागितली आहे. तर, या कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी या कंपनीतील अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आपल्या जीवाची पर्वा न करता लॉकडाऊनमध्येही घरी बसलेल्या लोकांना अन्न देण्याचे काम या स्विगीतील कर्माचाऱ्यांनी केले आहे. सुरुवातीला एका डिलिव्हरीमागे 35 रुपये या कामगारांना मिळत होते. पण, आता एका डिलिव्हरीमागे फक्त 15 रुपये मिळत आहेत. तसेच अगोदर मिळत असलेल्या अनेक सोयी स्विगी कंपनीने बंद केल्याने या कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दिवसभरात जे 300 ते 400 रुपये मिळत होते, तेथे आज 100 आणि 200 रुपये मिळत आहे. त्यातही पेट्रोल खर्च वेगळा असल्याने कमावल्यापेक्षा गमावल्याचे चित्र सध्या रोजच्या रोज या कामगारांना होत आहे. या सर्व प्रश्नसंदर्भात या कामगारांची मनसेकडे दाद मागितली आहे.