पुणे - कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे मोदी सरकार सातत्याने दुर्लक्ष करत आहे. एरवी आपण भारत देश हा कृषिप्रधान देश असल्याचे सांगतो. आणि जेव्हा कधी शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ येते तेव्हा पाठीमागे होतो. हरयाणा, पंजाब राज्यातील अनेक शेतकरी कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, या मागणीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन छेडले आहे. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अमोल हिप्पारगी म्हणाले.