पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आगामी निर्णयाबाबत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पुणे येथे सुरू झाली आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होत आहे.
आगामी निवडणुकीच्या निर्णयाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक सुरू - स्वाभिमानी
या बैठकीतनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीसोबत जाते की, ‘एकला चलो रे’ची भूमिका घेते हे समोर येईल.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीमध्ये स्वाभिमानीने हातकणंगले, वर्धा आणि बुलडाणा या जागा मागितल्या होत्या. मात्र, दोन्ही काँग्रेसने स्वाभिमानीला केवळ हातकणंगले येथील जागा देण्याची तयारी दाखवली होती. तसेच बुलडाण्यातील जागेवरूनही आघाडी आणि स्वाभिमानीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. किमान ३ जागा मिळाव्यात यासाठी स्वाभिमानी आग्रही आहे.
रविकांत तुपकर यांच्यासाठी बुलडाण्याच्या जागेसाठी खासदार राजू शेट्टी आग्रही आहेत. दरम्यान, भाजपला खाली खेचण्याची दोन्ही काँग्रेसची मानसिकता नसल्याची टीका तुपकर यांनी केली होती. तसेच १२ मार्चपर्यंत जागावाटपाचा तिढा न सोडवल्यास १५ स्वतंत्र उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचाही इशारा तुपकर यांनी यावेळी दिला होता. त्यामुळे आणखी जागा देण्यास दोन्ही काँग्रेसनी आखडता हात घेतल्याने स्वाभिमानीने ‘एकला चलो रे’ची मानसिकता केल्याचे दिसत आहे.