बारामती(पुणे) - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाबरोबरच बारामतीतील विविध सामाजिक संस्था, संघटना, ग्रुप व व्यक्तिशः अनेक जण आपापल्या परीने वस्तू व सेवा स्वरूपात योगदान देऊन माणुसकीचे दर्शन घडवत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील देसाई इस्टेट येथील ८० वर्षीय सुशिला रतनचंद बोरा तथा बाई हे त्यापैकीच एक नाव. बाई स्वतः कोरोनावर उपचार घेत असताना रुग्णांची जेवणावाचून होणारी अडचण त्यांनी प्रत्यक्षात पाहिली व ही अडचण दूर करण्यासाठी त्यांनी चारशेहून अधिक रुग्ण व नातेवाईकांना दररोज मोफत जेवण पुरवण्याचा वसा घेतला आहे. या बाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला विशेष रिपोर्ट...
बारामतीत आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळत असल्याने बारामती शहर व तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण बारामतीतील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. बारामतीत रुग्णांना उत्तम उपचार तर मिळत आहेतच. मात्र टाळेबंदीमुळे सर्वच प्रकारची खाद्यपदार्थ मिळण्याची दुकाने बंद असल्याने अनेक रुग्णांसह नातेवाईकांच्या जेवणाची गैरसोय होत होती. ही गैरसोय कोरोनाचे उपचार घेत असताना 'बाई' तथा सुशिला बोरा या ८० वर्षीय आजींना जाणवली आणि त्या बर्या होऊन घरी जाताच गरजू रुग्ण व नातेवाईकांना जेवण उपलब्ध करून देण्याचा वसा घेतला.
- पहाटे सहा वाजल्यापासून बाई राबतात
सर्वांना निरोगी आयुष्य लाभावे. सर्वजण आनंदात राहोत, अशी भावना मनात घेऊन बाईं मागील दोन आठवड्यापासून गरजूंना जेवण पुरवत आहेत. प्रारंभी शंभर डब्यापासून सुरुवात केली. सध्या ४०० हून अधिक जेवणाचे डबे 'बाई' स्वतः बनवून देत आहेत. यासाठी बाई आपल्या वयाचा विचार न करता पहाटे सहा वाजल्यापासून डबे बनवण्यासाठी तयार असतात. तांदूळ निवडणे, भाज्या कापणे, धुणे आधी सर्व कामे आजी स्वतः राबून करतात.