पुणे- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. त्या फोटोतून पवार कुटुंबात काही नाराजी नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न आहे का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. सुळे यांनी पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.
पवार कुटुंबात नाराजी नाही? सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या फोटोमुळे तर्क-वितर्कांना उधाण - rohit pwar
फन टाईम विथ फॅमिली कॅप्शनसह सुप्रिया सुळेंनी शेअर केला फॅमिली फोटो... पवार कुटुंबात सारं काही आलबेल असल्याचे सांगण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा.... पार्थ पवारांच्या उमेदवारीनंतर पवार कुटुंबातील नाराजीच्या सुरु होत्या चर्चा
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बहुचर्चित माढा मतदार संघातून शरद पवार यांनी माघार घेतली होती. तर दुसरीकडे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत शरद पवारांनी आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करावा, असे आवाहन केले होते. त्यावरून पवार कुटुंबीयांमधील नाराजी पहिल्यांदाच चर्चेला आली होती. मात्र, आता खासदार सुप्रीय सुळे यांनी एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. 'फन टाईम विथ फॅमिली' असे कॅप्शनही या फोटोंना दिले आहे.
रोहित पवार यांनी लिहलेल्या पोस्टमुळे ते नाराज असून पवार कुटुंबात सारं काही आलबेल नसल्याचेही बोलले जात होते. यावर रोहित पवार यांनी आमच्यात मतभेद नाहीत. केवळ साहेबांच्या प्रेमापोटी पोस्ट लिहिल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
सुप्रिया सुळेंनी पार्थ आणि रोहित पवार यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांचा हा फॅमिली फोटो शेअर केला आहे. त्यामुळे या फोटोच्या माध्यमातून आमच्या कुटुंबात सर्व काही ठिक आहे, असा संदेश तर सुळेंना द्यायचा नाही ना? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.