पुणे Supriya Sule On Assembly Election 2023 :चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं मोठी आघाडी घेतली असून भाजपा बहुमतार्यंत मजल मारत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे 'इंडिया' आघाडी आणि काँग्रेसची मोठी पीछेहाट झालेली आहे. यावर "जो जीता वही सिकंदर" अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. "2019 ला मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आलं होतं, परंतु लोकसभेचे निकाल वेगळे आले होते. त्यामुळं या निकालाचा लोकसभेवर परिणाम होणार नाही. त्याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी थोडा वेळ लागेल, आम्ही नक्की आत्मपरीक्षण करू" अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे.
अंतिम निकाल येईपर्यंत वाट पाहा :खासदार सुप्रिया सुळे या आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होत्या." वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं नेतृत्व होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांची लीडरशिप कशी यावर तिथले निकाल लागतात. स्थानिक प्रश्न वेगळे असतात, निश्चितपणानं याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. आम्ही ते करू. पण अंतिम निकाल येईपर्यंत वाट पाहा." असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस लोकसभेच्या 15 ते 16 जागा लढणार: सुप्रिया सुळे म्हणाल्या, "निवडणूक स्थानिक पातळीवर असते. अनेक निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढल्या गेल्या आणि एक्झिट पोल आपण पाहिले आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश मागच्यावेळी काँग्रेस जिंकलं होतं, भाजपा हरलं. मात्र लोकसभेला वेगळं चित्र समोर आलं होतं. मध्यप्रदेशमध्ये त्यांनी 'लाडली' नावाची स्कीम चालली आणि शिवराज सिंह यांच्यामुळे भाजपाला फायदा झाला. तेलंगणामध्ये रेवंथ रेड्डी यांनी लीड घेतली हे खूप चांगलं आहे. एक स्कीम मध्यप्रदेशमध्ये चालली पण तेलंगणात नाही. मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह यांची लीडरशिप दिसली. महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या आम्ही 15 ते 16 जागा लढणार आहोत," अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.