पुणे : Supriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केल्याच्या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर आता दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. शरद पवार गटापाठोपाठ अजित पवार गटानंही शरद पवार गटातील आमदारांना अपात्र करावं, असं पत्र महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना दिलंय. तसंच दोन्ही गटांकडून सातत्यानं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अजित पवार हे माझे मोठे बंधू आहेत. माझ्यावर जे संस्कार झाले आहेत, त्यात मोठ्या भावाचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे. मी कुठलीही घटना अजित पवारांच्या विरोधात मांडलेली नाही, मांडणारही नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिलीय. खासदार सुप्रिया सुळेंनी आज पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांबरोबरच इतर मंडळांनाही भेट दिली, यावेळी त्या बोलत होत्या.
मोदी व शाहांनी आपल्या विधानांचा खुलासा करावा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आम्ही जेव्हा विरोधात होतो तेव्हा मोठ-मोठे आरोप केले. मात्र, आमच्यातील एक घटक जेव्हा तुमच्या पक्षाबरोबर आल्यानंतर तुम्ही आधी केलेले आरोप हे राजकीय होते की खोटे होते याचा खुलासा करावा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय. जर तुम्ही केलेले आरोप खरे असतील तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. नाहीतर तुम्ही माफी मागितली पाहिजे, असंही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजपाचा त्या आमदाराला पाठिंबा : लोकसभेत भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात आम्ही लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलंय. नव्या संसदेत आम्ही जेव्हा आलो तेव्हा पंतप्रधानांनी जे भाषण केलं त्यात संवैधानिक पद्धतीनं नव्या संसदेत कारभार चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याला आम्ही साथही दिली. पण, भाजपाच्या खासदारानं त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम केलंय. ही त्यांची पहिली वेळ नाही, महिला आरक्षणाच्या बाबतीत महिला खासदारांकडून चर्चा होत असताना त्याच खासदारानं त्या महिला खासदारावर हल्ला केला होता. एकीकडं महिलांना आरक्षण देण्याची गोष्ट केली जाते तर दुसरीकडं महिलेचा अपमान केला जातोय. मात्र त्या खासदाराला भाजप पाठिंबा देत असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
अजित पवार आणि मी म्हणजे राष्ट्रवादी नाही : अजित पवारांची आणि आमची लढाई वैयक्तिक नाही. अजित पवार आणि मी म्हणजे राष्ट्रवादी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस एक विचार आहे. दादा आणि मी म्हणजे पक्ष असा जो गैरसमज आहे, तो सगळ्यांनी मनातून काढला पाहिजे, असंही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. भाजपा सत्ता आणि तपास यंत्रणांचा गैरवापर करून मराठी माणसाचं कंबरडं मोडण्याचं काम करतंय. मराठी माणसांनी शून्यातून पुढं आणलेल्या दोन पक्षांना फोडायचं आणि आपापसात भांडण लावायचं काम भाजपानं केलंय. मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमानाचा अपमान करण्याचं पाप भाजपानं केलंय. पण यात त्यांना यश मिळू देणार नाही, असा इशाराही सुप्रिया सुळेंनी दिलाय.
हेही वाचा :
- Supriya Sule slammed BJP : सुप्रिया सुळे यांनी संसदेत चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यावरून उपस्थित केला प्रश्न
- Ajit Pawar : अजित पवार राष्ट्रवादीत परत येणार; महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा
- Supriya Sule Criticize BJP : आघाडीच्या इंडिया नामांतरणाने केंद्रातील सत्ताधारी गोंधळले - सुप्रिया सुळे