पुणे (बारामती) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून "राष्ट्रवादी जीवलग" या उपक्रमाची घोषणा केली आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मायेचा आधार या माध्यमातून दिला जाणार आहे. कोरोनामुळे आई-वडीलांचे छत्र हरपलेले राज्यात जवळपास ४५० ते ४६० बालके आहेत. दोन्ही पालक गमावल्यामुळे या मुलांचे भविष्य अंधकारमय होते की काय, अशी भीती होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या मुलांचे पालकत्व घेत त्यांना आर्थिक मदत मिळेल, याची तरतूद केली. आर्थिक मदत मिळत असली, तरी आपल्या जवळच्या व्यक्तिचे प्रेम, आधार, पाठिंबा, सहकार्य मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टकडून राष्ट्रवादी जीवलग उपक्रम राबविण्यात येणार असून, ४५० 'राष्ट्रवादी सेवा दूत' या माध्यमातून मुलांचे पालक होणार आहेत.
काय आहे उपक्रम?
फेसबुक लाईव्हद्वारे खा. सुप्रिया सुळे यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. पालक गमावलेल्या मुलांसाठी सरकार विविध योजना राबवत आहेच. परंतु, दैनंदिन जीवनात या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांचे वाढदिवस असतील, शाळेतील पालकांची मीटिंग असेल, खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी बाहेर जाण्याचे मन करत असेल, अशा कामांमध्ये सरकार लक्ष घालू शकत नाही. त्यामुळे 'राष्ट्रवादी सेवा दूत' ही जबाबदारी उचलतील. राज्यातील ४५० मुलांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्याला देण्यात येणार आहे. वर्षभरात त्या मुलांना काय हवे, काय नको ते पाहण्याचे काम 'राष्ट्रवादी सेवा दूत' करतील.