पुणे Sunil Tatkare Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारसोबत जाऊन दुसरा भूकंप केला. अजित पवारांच्या बंडाळीमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्हीच राष्ट्रवादी असल्याचे दावे करण्यात आले आहेत. आता यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले की, आम्ही घेतलेल्या निर्णयाची पूर्ण माहिती घेत आम्ही निवडणूक आयोगाला माहिती दिलीय. मला खात्री आहे की, निवडणूक आयोग त्यांच्या प्रक्रियेनुसार निर्णय घेईल. आम्ही घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल, असा विश्वास यावेळी तटकरे यांनी व्यक्त केलाय.
राज्यभर सभा घेण्यात येणार :यावेळी ते म्हणाले की, उद्या कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षेखाली सभा होणार आहे. या सभेला सर्वच नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. जशी ऐतिहासिक सभा बीडमध्ये झाली, त्याच पद्धतीची सभाही कोल्हापूरमध्ये देखील होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे उद्या सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे दर्शन घेऊन कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. आम्ही जी भूमिका घेतलीय, ती राज्यातील जनतेला सांगण्यासाठी या सभा घेत आहोत. कोल्हापूरनंतर खानदेश त्यानंतर विदर्भ करत राज्यभर सभा घेण्यात येणार आहे. (Sunil Tatkare Press Conference Pune)
सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय : ते पुढे म्हणाले की, 2 जुलै रोजी जेव्हा आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो. तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं अलीकडच्या काळात दिलेले निर्णय, निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयांचा वैज्ञानिक कायदेशीरदृष्ट्या विचार केलाय. ज्येष्ठ कायदे अभ्यासक लोकांशी बोलून आम्ही सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. त्या निर्णयाची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आलीय. त्यानुसार काम सुरू केलंय, असं यावेळी तटकरे म्हणालेत.