महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औषधी वनस्पतींचा व्यवसाय, आदिवासी तरुणाची यशोगाथा

ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यात राहणाऱ्या सुनील पवारने औषधी वनस्पती लागवडीचे प्रशिक्षण घेतले आणि त्यातून व्यवसाय सुरू केला आहे. याद्वारे त्याने आदिवासी भागातील १८०० लोकांना रोजगारही प्राप्त करून दिला आहे.

औषधी वनस्पतींचा व्यवसाय
औषधी वनस्पतींचा व्यवसाय

By

Published : Jun 17, 2021, 9:27 AM IST

पुणे- ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी युवकाने औषधी वनस्पतींची लागवड करत त्यांच्या विक्रीतून कोट्यवधी चा व्यवसाय उभारल्याचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. सुनिल पवार असे या आदिवासी युवकाचे नाव असून सुनीलने युवकांसमोर नवा आदर्श उभा केला आहे.

आदिवासी युवकांना प्रेरणा

ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यात राहणारा सुनील पवार हा सुरुवातीला जंगलातून पूजा पत्री, समिधा गोळा करून विकण्याचे काम करत होता. हे काम आणखी पुढे नेत त्याने औषधी वनस्पती लागवडीचे प्रशिक्षण घेतले आणि त्यातून व्यवसाय सुरू केला. त्याने स्वतःची प्रगती तर केलीच शिवाय आदिवासी भागातील १८०० लोकांना रोजगारही प्राप्त करून दिला आहे.

औषधी वनस्पती सुविधा केंद्र

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला सुनील पवार हे पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती गोळा करण्याचे काम करत. एका कार्यक्रमात त्यांना आयुष मंत्रालयातर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन केलेल्या पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राविषयी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या विभागातून औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी, याचे प्रशिक्षण घेतले. तो कोरोना काळ असल्याने त्याच काळात गुळवेल औषधी वनस्पतीला मोठी मागणी होती. त्याच वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही गुळवेल प्रकल्प हाती घेतला होता. त्या वर्षी पवार यांनी ३४ टन गुळवेलची विक्री केली. तर यंदाचे वर्ष पूर्ण होण्याआधीच जानेवारी ते जून महिन्यात १०० टन गुळवेलची निर्मिती झाली आहे.

विद्यापीठाचे योगदान

विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागीय केंद्राचे संचालक डॉ. दिगंबर मोकाट यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या काळात गुळवेलचे उत्पादन कसे घ्यावे? त्याची साठवणूक कशी करावी? तसेच त्याची विक्री कुठे करावी?, याबाबत त्यांना प्रशिक्षण दिले.

नामांकित कंपन्यांना पुरवठा

त्यानुसार त्यांना अनेक आयुर्वेदिक उत्पादन करणाऱ्या संस्थांशी जोडून दिले. आज डाबर, हिमालया, वैद्यनाथ यासारख्या नामांकित कंपन्यांना अनेक औषधी वनस्पती सुनील पुरवतो. यासाठी त्याने आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ६ केंद्र सुरू केली असून, त्यात १८०० आदिवासी काम करतात. ज्या आदिवासी नागरिकांना रोज १०० रुपये मिळायचे ते आज यात काम करून ३०० ते ४०० रुपये रोज मिळवतात असेही पवार यांनी सांगितले.

काळाची गरज

औषधी वनस्पतीची शेती ही काळाची गरज आहे. अनेक लोक ही शेती करतात, मात्र योग्य मार्गदर्शन मिळाले तर व्यक्ती कुठे पोहोचू शकतो हे या उदाहरणावरून स्पष्ट होते. विद्यापीठात या औषधी वनस्पतीबाबत मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, समाजाला याचा उपयोग करून देण्याचा प्रयत्न आहे. असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

हेही वाचा -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा पदवी प्रदान समारंभ, राज्यपालांची ऑनलाईन उपस्थिती

ABOUT THE AUTHOR

...view details