महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डबे, चाळण विकणाऱ्याचा मुलगा झाला 'सीए'! - वैदू समाज

सुनील शामराव निंबाळकर, असे या तरुणाचे नाव आहे. सनदी लेखपालपदी (सीए) त्याची निवड झाल्याने परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सुनील शामराव निंबाळकर

By

Published : Aug 20, 2019, 10:09 AM IST

पुणे- जिल्ह्यातील बारामती तालुक्यातल्या डोर्लेवाडी येथील भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या वैदू समाजातील एका अत्यंत सामान्य कुटुंबातील युवकाने 'सीए'च्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. सुनील शामराव निंबाळकर, असे या तरुणाचे नाव आहे. सनदी लेखपालपदी (सीए) त्याची निवड झाल्याने परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डबे, चाळण विकणाऱ्याचा मुलगा झाला 'सीए'!

ग्रामपंचायत, वैदू समाज, मुस्लीम समाज यांच्यावतीने भव्य मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला. येथील अत्यंत गरीब कुटुंबातील घरात व समाजातही उच्च शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना जिद्दीने व खडतर परिस्थितीमध्ये अभ्यास करून सनदी लेखपालच्या परीक्षेत सुनीलने यश मिळवले. सुनीलला लहानपणापासूनच शिक्षणात रस असल्याचे दिसून आल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या पालकांनी पुणे जिह्यात तर कधी बाहेरच्या जिल्ह्यात, गावोगावी फिरून आपला पारंपरिक डबा-चाळण व इतर स्टेशनरी साहित्य विक्रीचा व्यवसाय करून त्याला शिक्षणासाठी पैसे पुरवले आहेत. काही वेळा उसनवारी व व्याजाने पैसे घेण्याचीही त्यांच्यावर वेळ आली आहे. सुनील यानेही आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून शिक्षण सुरू असतानाच नोकरी करून शिक्षणासाठी कुटुंबियांबरोबर स्वत:ही हातभार लावला आहे. सुनील याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण डोर्लेवाडी येथे घेतल्यानंतर बारामती येथील तुळजाराम चतुरचंद विद्यालयात बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरचे पुढील शिक्षण पुणे येथे घेतले. तीन वर्षापूर्वी सुनिलचा विवाह झाल्यानंतंरही संसार व शिक्षणाची दोन्ही चाके बरोबर घेऊन त्याने हे यश संपादन केले हे कौतुकास्पद आहेच. त्याही पलीकडे पत्नीने पतीच्या शिक्षणासाठी दोन वर्ष नोकरी करून मदत केली हे अत्यंत प्रशंसनीय आहे.

चार दिवसांपूर्वी सुनील निंबाळकर सनदी लेखपाल (सीए) झाल्याची बातमी गावात पसरली आणि परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने त्याचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details