पिंपरी-चिंचवड - महिला पोलीस कर्मचाऱ्याने वाकड येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज( 5 जुलै) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. श्रद्धा शिवाजी जायभाय (वय 28, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
- आत्महत्येचे कारण अस्पष्ट -
मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा जायभाय या पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत होत्या. त्या वाकडमधील पोलीस वसाहतीत राहत होत्या. श्रद्धा यांना चार वर्षांची मुलगी आहे. रविवारी रात्री त्यांनी त्यांच्या मुलीला नातेवाईकांकडे सोडले. त्यानंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मोबाईल फोन लागत नसल्याने त्यांच्या एका मैत्रिणीने वाकड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित घटना उघडकीस आली आहे. श्रद्धा जायभाय यांचे पती भारतीय नौदलात आहेत. दरम्यान, श्रद्धा यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.