पुणे - गरीबी शिक्षणाच्या आड येत नाही..! तर गरिबीवर मात करून शिक्षणाच्या वाटेवर यशस्वी झेंडा लावण्यासाठी गरज असते ती जिद्द अन् चिकाटीची.. या चिकाटीतून आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगाराच्या मुलाने दहावीत 93.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आपल्या मुला-बाळांसहित कारखान्याच्या स्थळावर गेली 16 वर्षे उसतोड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे घोरपडे कुटुंब आहे. त्यांचा शंकर हा मुलगा 10 वीत श्री संगमेश्वर माध्यमिक कै. बाबुराव गेणूजी कनिष्ट महाविद्यालय येथे शिक्षण पूर्ण करत आहे. दहावीच्या परीक्षेत शंकरने रात्रं-दिवस अभ्यास करून आणि आपल्या आई-वडिलांना उस तोडणीच्या कामात मदत करून 93.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. त्याच्या ह्या यशाचे सर्वजण कौतुक करत आहेत.मराठवाडा व विदर्भ या भागातून दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंब साखर कारखान्यांवर ऊसतोड कामगार म्हणून काम करत आहेत. आपले गाव शेत सारे काही सोडून वर्षानुवर्षे ऊसतोडीचे काम हे ऊसतोड कामगार करत असतात. यामध्ये त्यांच्या मुलांची मोठी फरफट होते. मात्र, यावरही मात करत ऊसतोड कामगाराच्या मुलाने दहावीत यशाचे शिखर गाठले. त्यामुळे संपूर्ण गावासह विद्यालयातील शिक्षकांनी शंकरचे कौतुक केले.पहाटेपासून आई-वडिलांसोबत शंकरही कामाला सुरुवात करायचा. काबाड कष्ट अन् मेहनत ही या मुलांच्या पाचवीलाच पुजलेली असताना आपण यशस्वी शिखर घाटायचे याची जिद्द मनात ठेवून शंकर अभ्यास करायचा. त्यात आई-वडिलांची साथ तर शिक्षकांची प्रेरणा उराशी घेऊन भिमाशंकर साखर कारखान्याच्या मदतीतून शंकरने मोठे यश संपादन केले.