बारामती -देशात ऊस गाळप हंगाम यंदा लवकर सुरू झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबरअखेर साखर उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. दरम्यान, चालू हंगामात ऊसाचा रस व बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलच्या उत्पादनावर भर असल्याने देशातील साखर उत्पादनात २० लाख टनांनी घट होईल, असेही 'इस्मा'च्या वतीने सांगण्यात आले आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) याबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. यंदाचा हंगाम लवकर चालू झाल्याने साखर उत्पादनात वाढ होऊन ती ४२.९ लाख टन झाले आहे. मागील हंगामात नोव्हेंबर अखेर देशात २०.७२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. देशातील यंदाचा साखर उत्पादनाचा प्रवाह मागील हंगामातील साखर उत्पादनाच्या कमी-अधिक प्रमाणात दिसून येत आहे. २०१८-१९च्या हंगामात नोव्हेंबर २०१८अखेर ४१८ साखर कारखान्यांत ४०.६९ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
महाराष्ट्रात यंदा १५.७२ लाख टन साखर उत्पादन
महाराष्ट्रात यंदा १५.७२ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी या कालावधीत महाराष्ट्रात १.३८ लाख टन साखर उत्पादन झाले होते. उसाची मुबलक उपलब्धताच व गाळप हंगाम यंदा लवकर सुरू झाल्याने महाराष्ट्रातील साखर उत्पादन वाढले आहे. कर्नाटकमध्ये यंदा ११.११ लाख टन साखर तयार झाली आहे. गतवर्षी तेथे ५.६२लाख टन साखर उत्पादन झाले होते. साखर उत्पादन करणाऱ्या प्रमुख राज्यात ऑक्टोंबर २०२०पासून साखरेच्या किमतीत घसरण झाली असल्याकडे इस्माने लक्ष वेधले आहे.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये साखरेच्या किंमती महाराष्ट्र व कर्नाटक प्रमाणेच
उत्तरेकडील काही राज्यात साखरेच्या किमतीत वाढ अथवा स्थिर आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक या प्रमुख राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून साखरेच्या किमतीत प्रतिक्विंटल ५० ते १०० रुपयाची घसरण झाली आहे. याठिकाणी साखरेच्या किंमती ३ पगार २०० ते ३ हजार २५० रुपयादरम्यान आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये साखरेच्या किंमती महाराष्ट्र व कर्नाटक प्रमाणेच आहेत.