पुणे Sudhir Mungantiwar on Congress : हिवाळी अधिवेशनात संसदेत 140 हून अधिक खासदरांचं निलंबन झालं असून या विरोधात विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. यावर राज्याचे वनमंत्री तसंच भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, टीका करणाऱ्यांनी काय काय केलंय हे मी 30 वर्ष बघितलंय. या विरोधात मी आवाज उठवला आहे. काँग्रेसला पॉलिटिकल अल्झायमर आजार झाला आहे. ते विसरुन जातात, की त्यांनी आधी काय केलंय, असं मुनगंटीवार यांनी म्हणत कॉंग्रेसवर टीका केलीय. पुण्यातील नातूबाग परिसरातील शुक्रवार पेठ इथं शिवप्रतापदिन उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते, यावेळी ते बोलत होते.
आम्ही जनतेच्या मनासाठी काम करतो : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीनिहाय जनगणेला विरोध असल्याबाबत मुनगंटीवार यांना विचारलं असता, ते म्हणाले की, संघानं अशी कुठलीही भूमिका घेतलेली नाही. जातनिहाय जनगणना ही बिहारमध्येही झालेली नाही. बिहारमधील जनगणना सोशो इकॉनोमिक कास्ट सेन्सर झालीय. आपल्याकडं देखील ती करण्यात आलेली आहे. 2011 मध्येही जातनिहाय जनगणना झाली नव्हती. तसंच सोशोच्या बाबतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडलीय. बिहारमधील रिपोर्ट आल्यावर महाराष्ट्रात गरज असेल, तर ती राज्यात करण्यात येईल. संघानं एक सूतोवाच केलंय, काही राजकीय पक्ष हे सत्तेची शिडी चढण्यासाठी विकास, देशाचा गौरव या पेक्षा जाती जातींमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांचं लक्ष फक्त मतं आहे, मात्र आम्ही मतासाठी नाही जनतेच्या मनासाठी काम करतो, असं यावेळी मुनगंटीवार म्हणाले.